(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कसबा गावची रहिवासी असलेली कु. रमा स्वप्नील जाधव हिने बीडीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.रमाने या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण घेत राष्ट्रीय स्तरावर १७ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ती सुवर्ण पदकासाठी पात्र ठरली आहे. रमा ही रत्नागिरी येथील दामले विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
रमा लहानपणापासूनच विविध उपक्रमात सहभागी होत असते.ती वकृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धेत सहभागी होऊन नंबर पटकावत असते. तिला नृत्याची आवड असून ती सध्या कथ्थकचे धडे गिरवत आहे. तसेच ती कराटे क्लासला सुद्धा जात असते.तिचे वडील स्वप्नील जाधव आयटीआय संगमेश्वर येथे प्राध्यापक आहेत तर आई राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत असिस्टंट मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
रमाला तिच्या वर्गशिक्षिका स्मितल कावतकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी कौतुक केले आहे.तिच्या यशाबद्दल कसबा पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.