(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक अध्यक्षपदी पाटगाव येथील प्रतीक सुनील साळवी यांची निवड करण्यात आली आहे. प्रतीक साळवी हे कुंभार समाजाचे विभागीय अध्यक्ष असून धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आमदार शेखर निकम यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, उत्तम जनसंपर्क आणि मितभाषी स्वभाव यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अजिंक्य आंब्रे, जि.प. सदस्य सुशील भायजे, शहराध्यक्ष हनीफ हरचिरकर, संघटक बाळू ढवळे, माजी युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, उपसभापती प्रफुल बाईत, पं.स. सदस्य मंगेश बांडागळे, आरुषी घवाळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी, “तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये बूथ कमिट्या मजबूत करून पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवावीत,” असे आवाहन केले.
नियुक्तीनंतर बोलताना प्रतीक साळवी यांनी, “शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत युवकांना एकत्र आणून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करीन,” अशी ग्वाही दिली.
दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, तालुका संपर्क प्रमुख तुकाराम मेस्त्री, महिला तालुका अध्यक्ष मानसी करंबेळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख उमेश महाडिक, उपसभापती प्रफुल्ल बाईत, जि.प. सदस्य सुशील भायजे, मंगेश बांडागळे, आरुषी घवाळी, बंधू सुर्वे, नगरसेवक यशवंत गोपाळ, दीपक खेडेकर, माजी उपसरपंच अमित जाधव आदींनी अभिनंदन केले.

