(चाफे/ हरेश गावडे)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये भाषण स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, सूत्रसंचालन स्पर्धा ,एकपात्री अभिनय स्पर्धा, वादन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, इत्यादी स्पर्धां चाफे मयेकर महाविद्यालयात घेण्यात आल्या.
डॉ. नानासाहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे. क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कला कौशल्य विकसित करुन चांगले करिअर घडवावे असा कै.नानांचा अट्टाहास होता. नानांच्या स्मृतीदिनी आयोजित अनेक स्पर्धांमध्ये मालगुंड हायस्कूल, जाकादेवी हायस्कूल ,काजुर्ली हायस्कूल, डी.जे .सामंत हायस्कूल, सुनिल मुरारी मयेकर कनिष्ठ महाविद्यालय, इत्यादी संस्थेच्या सर्व शाळांनी सक्रिय सहभाग दर्शवला होता.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका केतकी धुमक यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्या स्नेहा पालये यांनी केले, प्रास्ताविकेतून त्यांनी नानांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नानांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या, यामध्ये प्राथमिक विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड यांनी नानांचे शिक्षण क्षेत्राविषयी व ग्रामीण भागातील तरुण पिढीसाठी असलेले कृतीशील विचार त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीप्ती मयेकर होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष रोहित मयेकर, सचिव ऋषिकेश मयेकर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक किशोर पाटील, विस्तार अधिकारी प्राथमिक विभाग नरेंद्र गावंड, संस्थेच्या सी.ई.ओ राधिका मयेकर, प्राचार्या स्नेहा पालये, खजिनदार सुरेंद्र माचविले, मुख्याध्यापक जितेंद्र बोंबले, काजुर्लीचे पोलीस पाटील सीमा लिंगायत, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका केतकी धूमक यांनी मानले.

