(रत्नागिरी)
शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला अज्ञात कारने धडक दिल्याची घटना बुधवारी (९ जुलै) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विद्यार्थ्याच्या डाव्या पायावरून कारची दोन चाके गेल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
जखमी विद्यार्थ्याचे नाव अवनिश संदेश कडव (वय ११, रा. सह्याद्री नगर, नाचणे, रत्नागिरी) असे आहे. या अपघातानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात अवनिशची आई मंजिरी संदेश कडव (वय ३५) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अवनिश बुधवारी सकाळी शाळेसाठी जात असताना पटवर्धन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर अज्ञात कारने त्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावर न थांबता वाहनासह पलायन केले.
या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर शाळेच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर आणि सुरक्षिततेवर पालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

