(नाशिक / वृत्तसंस्था)
कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील आश्रमशाळेतील आठ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्हा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
सृष्टी सूर्यवंशी हिच्या मृत्यूच्या प्रकरणात डॉ. मोरे यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता. मात्र त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यानंतर डॉ. मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत गेल्या तीन वर्षांपासून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. कामे वेळेत पूर्ण न करणे, कर्मचाऱ्यांना त्रास देणे आणि आरोग्य केंद्रांना भेटी न देणे, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या. बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांचीही चौकशी झाली होती. याशिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावली होती. अखेर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, सृष्टीच्या मृत्यूनंतर विसापूर शासकीय आश्रमशाळेतील २४ विद्यार्थ्यांमध्ये ताप आणि व्हायरल संसर्गाची लक्षणे आढळल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सृष्टीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.
सृष्टीला आश्रमशाळेत असताना ताप आला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन औषधोपचार केले. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारल्याने तिला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी तिला पुन्हा ताप आला. त्यानंतर अधीक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिला अचानक उलटी झाली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
सृष्टीच्या मृत्यूबाबत तिच्या पालकांनी संशय व्यक्त केला आहे. या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदनाचा अहवाल आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आश्रमशाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागे सेंट्रल किचन कारणीभूत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे आदिवासी विभागाला दिल्याची माहितीही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे सृष्टीच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि या संपूर्ण प्रकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
डॉ. मोरे यांनी कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र (CTC) तातडीने सादर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निलंबन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून त्याची नोंद डॉ. मोरे यांच्या सेवापुस्तकात घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, डॉ. मोरे यांच्याविरोधात विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र, या तक्रारींमधील आरोपांबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. निलंबनाची कारवाई आणि कार्यभार हस्तांतरणासंदर्भातील आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जारी केले आहेत.

