(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त होणारा संपूर्ण नियतव्यय १०० टक्के वेळेत खर्च करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत आरोग्य, वने, क्रीडा, मत्स्यव्यवसाय तसेच शहरातील अतिक्रमणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जंगल सफारीसाठी नवीन वाहनांची खरेदी
पर्यटकांना जंगल सफारीसाठी आवश्यक असणारी नवीन वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तात्काळ खरेदी करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वनविभागाला दिल्या.
मिरकरवाडा, हर्णे आणि नाटे बंदरांच्या विकासाला गती
बंदरांमध्ये जुन्या आणि वापरात नसलेल्या बोटी तात्काळ हटवाव्यात. मिरकरवाडा, हर्णे आणि नाटे या बंदरांच्या विकासाची कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना मेरिटाईम बोर्डाला देण्यात आल्या.
क्रीडा, शिक्षण आणि आयटीआय वसतिगृहाला प्राधान्य
विभागीय क्रीडा संकुलाची उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच जिल्हा नियोजन समितीचा निधी मुलांच्या शैक्षणिक सुविधा आणि आयटीआय वसतिगृहाच्या कामांसाठी प्राधान्याने खर्च करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले.
पशुवैद्यकीय चिकित्सालयांची कामे तातडीने पूर्ण करा
जिल्ह्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
२५ तारखेपर्यंत हॉकर्स झोन निश्चित करा; अतिक्रमणावर कडक भूमिका
शहरातील अतिक्रमणाच्या आढावा बैठकीत बोलताना डॉ. सामंत यांनी पथविक्रेत्यांना हॉकर्स झोनमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्यामध्ये स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले. नगरपालिकेने येत्या २५ तारखेपर्यंत हॉकर्स झोन निश्चित करावेत. मात्र, ज्या विक्रेत्यांकडून फूटपाथ अडवण्याचा हट्ट केला जाईल, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य यंत्रणा बळकट करा; नैसर्गिक प्रसूती वाढवण्यावर भर
‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’च्या पहिल्या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला. ग्रामीण भागातील गरोदर महिलांना विनाकारण खासगी रुग्णालयात पाठवले जाऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला. ‘आयुष्मान भारत’ योजनेतील दररोजच्या खर्चाची माहिती नातेवाईकांना देण्यात यावी, संगमेश्वर ट्रामा केअर सेंटरमधील समस्या सोडवाव्यात तसेच चिपळूणमधील असुर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मजूर संस्थांना ३३ टक्के कामे बंधनकारक
शासकीय नियमांनुसार जिल्ह्यातील १२९ नोंदणीकृत मजूर संस्थांना एकूण कामांपैकी ३३ टक्के कामे वाटप झालीच पाहिजेत. सर्व तालुक्यांमध्ये या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ परिपत्रक काढावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

