(संगमेश्वर / एजाज पटेल)
मौजे तेर्ये ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल दौलत दळवी यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वर्षी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
गेल्या तीन वर्षांत गावातील शांतता, सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. बुरंबी येथील श्री वाघजाई ग्रामदेवता मंदिरात ही विशेष ग्रामसभा उत्साहपूर्ण आणि शांत वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्षपदासोबतच उपाध्यक्षांसह एकूण ३३ सदस्यांची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. साक्षी शशांक शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
सुनिल दळवी यांनी गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ग्रामस्तरावर निर्माण होणारे आपापसातील वाद, तंटे आणि गैरसमज न्यायालयात किंवा पोलिसांत न जाता सामोपचाराने गावातच मिटवण्यासाठी प्रयत्न केले. निष्पक्षपणे आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या त्यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. त्यांच्या यशस्वी कार्यप्रणालीमुळे आणि ग्रामस्थांच्या अखंड विश्वासामुळे सलग चौथ्या वर्षी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या प्रसंगी ग्रामसेवक प्रशांत शेट्ये, सरपंच सौ. दुर्वा भुरवणे, मुख्य मानकरी श्री. प्रकाश दळवी, माजी सरपंच श्री. संदीप भुरवणे, युवा नेतृत्व श्री. सतीश पवार तसेच पंचायत समिती सदस्या सौ. आरुषी आनंद घवाळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल दळवी, उपाध्यक्ष सौ. साक्षी शिंदे तसेच सर्व ३३ सदस्यांचे उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महात्मा गांधी तंटामुक्त समिती, मौजे तेर्ये : नवीन कार्यकारिणी
श्री. सुनिल दौलत दळवी व सौ. साक्षी शशांक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन समितीत सौ. दुर्वा मयुर भुरवणे, श्री. प्रचित पांडुरंग मोहिते, सौ. संपदा सुनीलदत्त जोशी, श्री. भरत दौलत दळवी, श्री. आनंद तुकाराम घवाळी, श्री. संदिप बाळ भुरवणे, श्री. मनोज किशोर लोहिया, श्री. नरेश पांडुरंग शेळके, श्री. सूर्यकांत तानाजी घवाळी, सौ. प्रियंका प्रकाश गेल्ये, श्री. सतीश नामदेव पवार, श्री. अशोक गंगाराम मोहिते, कु. आदित्य अशोक गावडे, श्री. अजित रामचंद्र मोहिते, श्री. प्रभाकर रत्ना मोहिते, श्री. रमेश नारायण भुरवणे, श्री. शरद गोविंद बाईत, सौ. नंदिनी संजय मोहिते, श्री. अजय लक्ष्मण भुरवणे, श्री. शशांक गणपत शिंदे, श्री. दिलीप दौलत दळवी, श्री. प्रकाश सिताराम दळवी, श्री. बाबू धोंडू भुरवणे, सौ. तनुजा उदय भुरवणे, श्री. विलास विजय भरणकर, श्री. संजय गोविंद गेल्ये, श्री. विनय मनवर, श्री. उदय रामचंद्र भुरवणे, श्री. प्रशांत पांडुरंग शेट्ये, सौ. सुश्रीता अशोक कांबळे आणि श्री. मनोज शिंदे यांचा समावेश आहे.
“ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन” : सुनिल दळवी
“तेर्ये गावातील ग्रामस्थांनी, सर्व मान्यवरांनी आणि लोकप्रतिनिधींनी सलग चौथ्या वर्षी माझ्यावर विश्वास दाखवून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची बिनविरोध जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. गेल्या तीन वर्षांत संपूर्ण समितीच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या पाठिंब्याने गावात सलोखा व शांतता राखण्यात आम्हाला यश आले. आगामी काळातही पोलीस, प्रशासन आणि सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावातील छोटे-मोठे वाद आपापसात सामोपचाराने मिटवून गाव तंटामुक्त व भयमुक्त ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

