(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील जांभारी येथे गावठी बॉम्बच्या भीषण स्फोटात एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याच्या प्रकरणाचा अखेर दीड महिन्यानंतर उलगडा करण्यात जयगड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी देवरुख येथील अविनाश गोपिनाथ खेडेकर (वय ३६) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यामागे आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
१९ मे २०२५ रोजी जांभारी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५) या पतीसह जंगलात घराच्या कुंपणासाठी लागणारे कळक आणण्यासाठी गेल्या होत्या. कळक तोडण्याचे काम सुरू असताना त्यांच्या पती घरी पाणी आणण्यासाठी गेले. त्याचवेळी कळक गोळा करत असताना रेश्मा यांना जमिनीवर पडलेली गोलाकार वस्तू दिसली. ती हातात उचलताच अचानक भीषण स्फोट झाला.
स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, रेश्मा सुर्वे यांच्या हाताची बोटे तुटून त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान परिसरात आणखी २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. प्राथमिक तपासात हे गावठी बॉम्ब जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात पेरून ठेवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि विविध धागेदोरे तपासत अखेर पोलिसांनी संशयित अविनाश खेडेकर याला देवरुख येथून ताब्यात घेतले. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तपासादरम्यान गावठी बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्याने कोठून मिळविले, बॉम्ब नेमके कुठे आणि कशा पद्धतीने तयार केले, ते जांभारी परिसरात कसे पोहोचविण्यात आले, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी जयगड परिसरात झालेल्या गावठी बॉम्बच्या दुसऱ्या एका स्फोटात बैल गंभीर जखमी झाला होता. त्या घटनेचा या संशयिताशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणातून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावठी बॉम्बसारख्या जीवघेण्या स्फोटकांचा वापर करून जंगली प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार अद्याप सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, वन्यजीव संरक्षणासह सर्वसामान्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

