(जुन्नर / पुणे)
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नाणेघाट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणाचा दाट धुक्यामुळे तोल जाऊन खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी (19 जुलै) सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. विशेष म्हणजे, तरुणाच्या मोबाईलवर अद्यापही रिंग जात असल्याने तो दरीतच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, त्याला शोधण्यासाठी दोन्ही बाजूंनी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
दरीत कोसळलेल्या तरुणाचे नाव दत्ता विनायक लोंढे (वय 22, रा. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आहे. दत्ता हा आपल्या आणखी तीन मित्रांसोबत नाणेघाट येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता. सकाळच्या सुमारास संपूर्ण परिसरात दाट धुके पसरले होते. त्यावेळी कड्याच्या परिसरात फिरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेकडो फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना घडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक बचाव पथके, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके, घसरडा कडा आणि दरीची मोठी खोली यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.
शोधमोहीमेदरम्यान पोलिसांनी दत्ता लोंढे यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. मोबाईलवरही रिंग जात असल्याने तो दरीतच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तांत्रिक माहितीनुसार, मोबाईलचे लोकेशन नाणेघाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दिशेने आढळून आले आहे. त्यामुळे वरच्या बाजूने दरीत उतरण्याऐवजी ठाणे जिल्ह्याच्या बाजूने बचाव पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या मार्गाने दरीत पोहोचणे तुलनेने सोपे असल्याने शोधमोहीम अधिक वेगाने राबवता येईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थानिक प्रशासन, वन विभाग, ग्रामस्थ आणि बचाव यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. अधिकृत रेस्क्यू पथकही घटनास्थळी दाखल झाले असून अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने दरीत शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. हवामानात सुधारणा होताच शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नाणेघाट हे सह्याद्रीतील सर्वाधिक लोकप्रिय वर्षा पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. पावसाळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक येथे धबधबे, दाट धुके आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, घसरडे कडे, खोल दऱ्या, कमी दृश्यमानता आणि धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो किंवा सेल्फी घेण्याचा मोह यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. दाट धुक्यात कड्याच्या टोकावर जाणे टाळावे, सुरक्षित अंतर राखावे, सेल्फी किंवा अतिसाहस करू नये आणि हवामानाचा अंदाज घेऊनच पर्यटनाला जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

