महाकुंभ चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या दुर्घटनेनंतर बुधवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. माध्यमांना निवेदन देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे, या संपूर्ण घटनेची 3 सदस्यीय पथकाकडून न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पथक महिनाभरात आपला तपास अहवाल सरकारला सादर करणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर तपास पथकात माजी डीजी व्हीके गुप्ता, माजी आयएएस डीके सिंह यांचा समावेश असेल.
या घटनेनंतर प्रशासन आणि विविध आखाड्यांशी चर्चा झाली. सकाळपासून पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतरांकडून या संदर्भात सतत निर्देश आणि मार्गदर्शन मिळत होते. याप्रकरणी मुख्य सचिव आणि डीजीपी 30 जानेवारीला घटनास्थळी जाणार आहेत. मौनी अमावस्येला बुधवारी पहाटे झालेल्या महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेश चे पोलिस डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६० जखमी रुग्णालयात दाखल आहेत.
ते म्हणाले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 25 लोकांची ओळख पटली आहे, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांतील लोकांचा मृत्यूच्या संख्येत समावेश आहे. अपघातानंतर एकूण 90 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी सध्या गंभीर जखमी असलेले ६० जण दाखल आहेत, उर्वरित सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
महाकुंभात अमृत स्नानाचे काय आहे कनेक्शन
मौनी अमावस्येला संगम नोजवर अमृत स्नान केल्याने जन्म-पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळून जीवनात मोक्ष मिळतो, असे मानले जाते. यावेळी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान आखाडा मार्गावर शेकडो भाविक आधीच उपस्थित राहून अमृतस्नानासाठी ब्रह्म मुहूर्ताची वाट पाहत असताना दुसऱ्या बाजूच्या जमावाने बॅरिकेड्स तोडून उड्या मारून पुढे जाण्यास सुरूवात केल्याने चेंगराचेंगरी झाली. वाटेत विश्रांती घेणारे भाविक जमावाने तुडवले गेले, त्यांना उठून उभे राहायलाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. कुंभ, महाकुंभ, मकर संक्रांत, पौष पौर्णिमा, मौनी अमावस्या, शाही स्नान किंवा इतर पवित्र गंगास्नान या प्रसंगी संगम नोजवर गंगा स्नान करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे तेथील संगम नाकापर्यंत जाण्यासाठी आखाड्याचा मार्ग तयार करून बॅरिकेड्स लावले जातात. या मार्गावर सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी आहे. साधू-संत या मार्गावरून जाऊन अमृतस्नान करतात. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मेळा प्रशासनाने तेथे त्रिवेणी रस्ताही बांधला होता, मात्र मोठ्या गर्दीमुळे बॅरिकेड्स तोडून चेंगराचेंगरी झाली.
प्रयागराजमधील संगम नोज हे ते ठिकाण आहे जिथे गंगा, यमुना आणि नामशेष झालेली सरस्वती नदी एकत्र येते. याला त्रिवेणी असेही म्हणतात. नावाप्रमाणेच त्याचा आकार नाकासारखा असतो. म्हणून या संगम क्षेत्राला संगम नाक म्हणतात. तो त्रिकोणी आहे. येथे उत्तर दिशेकडून गंगेचा अखंड प्रवाह वाहत आहे, तर दुसरीकडे दक्षिण दिशेकडून यमुनेचा प्रवाह गंगेत विलीन होताना दिसतो. दोन्ही नद्यांच्या पाण्याचा रंग संगमाच्या ठिकाणी वेगवेगळा असतो. गंगेचे पाणी हलके गढूळ दिसते, तर यमुनेचे पाणी हलके निळे दिसते. इथून यमुनेचा प्रवास संपतो आणि ती गंगेत विलीन होते.