(नाशिक)
नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (6 मार्च) सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता त्यांच्या कुटुंबीयांनी पतीवर गंभीर आरोप केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू असताना कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे अधिक गंभीरतेने पाहिले जात आहे.
विवाहबाह्य संबंध; पतीवर मानसिक छळाचा आरोप
मृत डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यांच्याकडून मनीषा जेजुरकर यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून मनीषा जेजुरकर या मानसिक तणाव आणि छळाला सामोऱ्या जात होत्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी कुटुंबीयांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू केली असून सर्व बाबींची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
आयुर्वेदिक क्षेत्रातील ओळख
डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमध्ये आयुर्वेदिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे Sarvam Ayurved Multi-Speciality and Panchakarma Center हे केंद्र शहरात कार्यरत असून आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्या अनेक रुग्णांना उपचार देत होत्या. रुग्णांना आयुर्वेदिक उपचार आणि वैकल्पिक चिकित्सा पद्धतीद्वारे आरोग्य लाभ देणाऱ्या डॉक्टरांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याने वैद्यकीय क्षेत्रासह शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली जात आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

