( मुंबई )
मुंबईतील बेस्ट (BEST) परिवहन उपक्रमाच्या बस अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच सोमवारी सकाळी मानखुर्द परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला. सायन-पनवेल महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर बेस्टच्या मार्ग क्रमांक 501 वरील बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावरील दुभाजक, पादचारी तसेच पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 62 वर्षीय पादचारी भास्कर रावसाहेब कागदे यांचा मृत्यू झाला असून बस चालक, वाहक आणि प्रवाशांसह एकूण 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेस्ट उपक्रमाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाडेतत्त्वावरील मातेश्वरी कंत्राटदाराची प्रतिक्षानगर आगारातील बस (मार्ग क्रमांक 501/34, बस क्रमांक 8091, MH-01-MP-3777) सोमवारी (20 जुलै) सकाळी सुमारे 8.30 वाजता कुर्ला बस स्थानक (पूर्व) ते ऐरोली या मार्गावर नियमित फेरी करत होती. मानखुर्द येथील सायन-पनवेल महामार्गावर विश्वकर्मा रुग्णालयासमोर पोहोचताच बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि भरधाव बसने प्रथम रस्त्याच्या दुभाजकाला, त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या पादचाऱ्याला धडक देत मानखुर्द पुलाच्या कठड्यावर जोरदार धडक मारली.
या भीषण धडकेत दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब कागदे (वय 62) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचा जोर इतका मोठा होता की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात बस चालक बनवारीलाल शर्मा (49), बस वाहक वैभव सुखदेव वाघमारे (41) यांच्यासह आठ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये शिवमंगल मैथी (42), गणेश पटेल (24), शंकर साठे (47), संकेत नाकती (25), राजेश वरुगणिये (35), अंकिता जाधव (22), रंजना घोरपडे (53) आणि लता वाघेला (42) यांचा समावेश आहे. यापैकी प्रवाशांवर शताब्दी रुग्णालयात, तर चालक आणि वाहकावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अपघात होताच परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि पादचारी घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढत प्राथमिक मदत केली आणि तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बेस्ट प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
प्राथमिक चौकशीत बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले असून, याबाबतचा तांत्रिक अहवाल तयार करण्यात येत आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून बसची यांत्रिक तपासणी सुरू केली असून, प्रत्यक्ष कारणांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, चालकाचा जबाब आणि तांत्रिक अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः भाडेतत्त्वावरील बसांच्या देखभाल-दुरुस्ती, नियमित फिटनेस तपासणी आणि सुरक्षितता मानकांबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या ताज्या अपघातानंतर बेस्ट प्रशासनानेही घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

