(पुणे)
सिंहगड किल्ला येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या 55 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेषतः वयोवृद्धांनी गड-डोंगर चढणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मृत पर्यटकाचे नाव सुरेश रघुनाथ भोकरे असे असून ते कात्रजमधील गोकुळनगर परिसरात राहात होते. ते आपल्या मित्रांसह सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे 5 वाजता ते आतकरवाडी पायथ्याशी पोहोचले आणि सव्वा पाचच्या सुमारास पायवाटेने गड चढण्यास सुरुवात केली. पढेर मेटावरील मारुती मंदिराजवळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा चढाई सुरू करताच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते कोसळले. त्यांना तातडीने स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याशी आणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उष्णतेत ट्रेकिंग टाळण्याचा सल्ला
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून तीव्र उष्णता आणि शारीरिक श्रमामुळे हृदयविकाराचा झटका किंवा डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे वयोवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी डोंगर चढणे टाळावे, असे आवाहन वन विभागाचे अधिकारी समाधान पाटील यांनी केले आहे. तसेच भर दुपारी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि शरीराची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

