( संगमेश्वर / एजाज पटेल )
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तसेच काही खासगी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नोंदणी शिबिरांमध्ये शुल्क वसुलीबाबत कथित अनियमिततेची चर्चा रंगली आहे. शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शासनाने स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये शुल्क निश्चित केलेले असताना, काही शिबिरांमध्ये नागरिकांकडून २५० ते ३०० रुपये आकारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याचा आरोप असतानाही नागरिकांना १९९ रुपयांचीच अधिकृत पावती देण्यात आल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे या शुल्कातील तफावतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये तसेच काही खासगी निवासस्थानी भरविण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. शासनाने निश्चित केलेल्या शुल्काची माहिती नसल्यामुळे अनेकांनी मागणीप्रमाणे रक्कम भरल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे तालुकाभर चर्चेला उधाण आले आहे.
शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम कोणत्या कारणास्तव आकारण्यात आली, अधिकृत पावतीवर केवळ १९९ रुपयांचाच उल्लेख का करण्यात आला आणि अतिरिक्त रक्कम कोणाच्या निर्देशानुसार घेण्यात आली, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, संबंधित एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करावी आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

