(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबई उच्च न्यायालयाने तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला (FDA) दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये खडेबोल सुनावले. न्यायालयाच्या या ताशेऱ्यांनंतर FDAला पुण्यातील ‘सिप्ला’ (Cipla) आणि मुंबईतील ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या (MCA) आवारात सुरू असलेल्या पाच खाद्यपदार्थांच्या आस्थापनांविरुद्ध काढलेले आदेश मागे घ्यावे लागले.
‘अतिघाईने’ निर्णय घेणे, कायद्याचे योग्य विश्लेषण न करणे आणि एका प्रकरणात न्यायिक तत्त्वांचे उल्लंघन करणे, यासाठी न्यायालयाने FDAवर तीव्र नाराजी व्यक्त केली. MCA प्रकरणात नियामक संस्थेने ‘व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता केवळ पुस्तकी किंवा तांत्रिक दृष्टिकोन’ स्वीकारल्याचेही खंडपीठाने नमूद केले. याच सुनावणीदरम्यान न्यायालयाने FDAला, ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ असा सवाल केला होता. या टिप्पणीवर तुकाराम मुंढे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
‘मी देव नाही, मी तुकाराम मुंढे आहे’
तुकाराम मुंढे यांना न्यायालयाच्या टिप्पणीबाबत विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. “मी देव नाही, मी तुकाराम मुंढे आहे, जनतेचा सेवक आहे. घाई अजिबात होत नाही. आपण प्रक्रियेचं पालन करतो. जिथे काही त्रुटी असतील आणि कोर्ट ते दाखवत असेल तर आम्ही नक्की त्यात सुधारणा करू,” असे मुंढे यांनी सांगितले.
‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ कोर्टाने FDAला सवाल का केला?
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील MCA परिसरातील पाच रेस्तराँशी संबंधित सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने FDAच्या कार्यपद्धतीवर कठोर निरीक्षणे नोंदवली. अन्नसुरक्षा मानकांचे पालन करण्याबाबत झालेल्या ताज्या तपासणीत या रेस्तराँनी 88 टक्के निकष पूर्ण केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने FDAच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.
“तुम्ही स्वतःला ‘ईश्वर’ समजता का आणि तुम्हाला वाटेल तसे वागता येईल असे तुम्हाला वाटते का?” असा सवाल न्यायालयाने FDAला केला. विभागाने वारंवार अवाजवी घाई का केली, यावरही न्यायालयाने जाब विचारला.
या प्रकरणाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहून विचारपूर्वक निर्णय घेण्याचे निर्देश यापूर्वीच FDAला देण्यात आले होते. मात्र, त्याऐवजी विभागाने केवळ नियमांच्या शब्दशः अर्थावर भर देणारा (pedantic) दृष्टिकोन स्वीकारल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
‘फटकारून थकलो आहोत’, कोर्टाचा FDAला इशारा
“सतत विभाग आणि अधिकाऱ्यांना फटकारून आम्ही आता थकलो आहोत. आता कठोर आदेश देण्याची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करू. त्यांनी आम्हाला त्यांचे म्हणणे पटवून द्यावे किंवा मग तुरुंगात जावे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
यानंतर FDAने न्यायालयाला माहिती दिली की, पाच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचे कामकाज स्थगित करण्याचा आदेश मागे घेतला जाईल. तसेच MCAला नवीन नोटीस बजावून ‘मेसर्स शिर्के इन्फ्रास्ट्रक्चर’सोबतच्या कराराबाबत आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल.
न्यायालयाने FDAची ही भूमिका मान्य केली. संबंधित खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आता अन्नसुरक्षा नियमांचे पालन करत असल्याने त्यांच्यावरील कामकाज स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला असून, ही उपाहारगृहे पुन्हा सुरू होऊ शकतात, असे न्यायालयाने नमूद केले.

