(रत्नागिरी / वार्ताहर)
पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या वापराविरोधात तसेच रस्त्यावरील मंडपांमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पुण्यात मारहाण करण्यात आली. गणेशोत्सवाबाबत विद्यानंद बापट यांनी केलेल्या विधानांमुळेच हल्ला केल्याचे हल्लेखोराने सांगितल्याची माहिती आहे. या घटनेनंतर रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांनी मुलाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या काही वर्षांपासून ते पुण्याच्या नारायण पेठ परिसरात वास्तवास आहेत. ते एक सामान्य जागरूक नागरिक असून विविध सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याशीही ते जोडलेले आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी (B.Com) प्राप्त केली आहे.
‘तुझी भूमिका योग्य आहे, आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. काळजी घे, सांभाळून राहा,’ असा धीर विद्यानंद यांच्या आई-वडिलांनी त्यांना दिला आहे. विचाराने सोडवता येणारा प्रश्न विचारानेच सोडवला पाहिजे, मात्र त्यासाठी मारहाणीचा मार्ग स्वीकारणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यानंद बापट सध्या कामानिमित्त पुण्यात स्थायिक असून, त्यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील गोळप आहे. त्यांचे वडील सुहास कृष्णाजी बापट आणि आई कल्पना बापट हे गोळप येथे राहतात. गणेशोत्सवातील डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि रस्त्यांवरील मंडपांमुळे निर्माण होणाऱ्या त्रासाविरोधात विद्यानंद यांनी भूमिका घेतली आहे. याच भूमिकेमुळे गुरुवारी पुण्यात त्यांच्यावर मारहाणीचा प्रकार घडला.
‘माझ्या मुलाची भूमिका योग्य; त्याने आपला मार्ग सोडू नये’
हल्ल्याच्या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना विद्यानंद यांचे वडील सुहास बापट यांनी मुलाच्या भूमिकेचे समर्थन केले. “माझ्या मुलाने डीजेविरोधात जी भूमिका घेतली आहे, त्याचे मी समर्थन करतो. आज त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. त्याने सांभाळून राहावे. तुझी भूमिका योग्य असून, आम्ही काही लागले तरी तुझ्या पाठीशी आहोत. पुढेही असाच मार्ग चोखाळत जा,” असे सुहास बापट यांनी सांगितले.
“जो मुद्दा विचाराने सोडवता येण्यासारखा आहे, तो तसाच सोडवला पाहिजे. पण या सर्व घटनांमुळे काळजी वाटते. आज घडलेली घटना निषेधार्ह आहे,” असेही त्यांनी म्हटले.
हल्ल्यानंतर सुहास बापट यांनी मुलाशी फोनवरून संपर्क साधून “जास्त लागलं आहे का? बरा आहेस ना?” अशी विचारपूस केली. विद्यानंद यांनी आपण बरे असल्याचे सांगितल्यानंतर मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा पुण्यात आणि आपण रत्नागिरीतील गोळप येथे असल्याने घटनास्थळी तातडीने पोहोचणे शक्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आईचीही चिंता; ‘पोलिसांनी संरक्षण द्यावे’
विद्यानंद यांच्या आई कल्पना बापट यांनीही मुलाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दिला. मात्र, हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली.
“विद्यानंदशी बोलणे झाले असून तो व्यवस्थित आहे. त्याने जपून राहावे, सांभाळून राहावे, असे आम्ही त्याला सांगितले आहे. आम्ही रत्नागिरीतील गोळप येथे लांब असल्याने लगेच त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोलिसांनी त्याला संरक्षण द्यावे, तेवढाच आम्हाला दिलासा मिळेल. तो जे विचार मांडत आहे, त्याची गणेशोत्सवात प्रचिती व्हावी. हल्ला न करता बोलून प्रश्न सोडवला पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वादानंतर विद्यानंद बापट यांच्या मुलाखती आणि चर्चांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. त्यांचा न अडखळता, सलग आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडण्याचा बोलण्याचा प्रवाह पाहून अनेकांनी त्यांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे आणि अभ्यासाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेला काही स्तरांतून तीव्र विरोधही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुण्यात डीजेचा वापर, गणेशोत्सव आणि संस्कृतीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद अधिकच चिघळला असून, या प्रकरणावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
हल्लेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. संबंधित हल्ला करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात असून, विद्यानंद बापट यांना पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे रत्नागिरीत राहणाऱ्या आई-वडिलांची चिंता वाढली असली तरी ध्वनी प्रदूषणाविरोधातील विद्यानंद बापट यांची भूमिका योग्य असून, त्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांच्या आई-वडिलांनी स्पष्ट केले आहे.

