(नवी दिल्ली)
७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित या चित्ररथातून परंपरा, संस्कृती आणि स्वावलंबन यांचा प्रभावी संगम साकारण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार पहायला मिळाले.
परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम
महाराष्ट्राच्या चित्ररथामधून गणेशोत्सवाचा ऐतिहासिक आणि सामाजिक प्रवास प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले, त्या ऐतिहासिक टप्प्यापासून ते आजच्या काळात स्थानिक कारागीर, कुटीर उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या उत्सवापर्यंतचा प्रवास या चित्ररथातून मांडण्यात आला.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि कारागिरीचे दर्शन
चित्ररथाच्या समोरील भागात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. तर मागील बाजूस पेण आणि पुणे येथील कुशल कारागिरांच्या नाजूक आणि देखण्या कलाकुसरीचे सादरीकरण करण्यात आले. गणेशोत्सवामुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेला कसा आधार मिळतो, हे या सादरीकरणातून ठळकपणे अधोरेखित झाले.

ढोल-ताशांचा गजर; राजधानीत महाराष्ट्राची ऊर्जा
चित्ररथासोबत ढोल-ताशा पथकांनी सादर केलेल्या स्फूर्तिदायक तालांनी कर्तव्य पथावरील वातावरण भारावून टाकले. मुंबई आणि पुण्याच्या सांस्कृतिक ऊर्जेचा ठसा थेट देशाच्या राजधानीत उमटताना पाहायला मिळाला.
प्रजासत्ताक दिन संचलनातील ठळक वैशिष्ट्ये
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अनेक ऐतिहासिक घडामोडी साक्षीदार ठरल्या. युरोपियन युनियनचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन हे यंदाच्या संचलनाचे प्रमुख पाहुणे होते.
भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सादरीकरण करण्यात आले. तसेच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी ‘बॅटल अॅरे’ रचना आणि स्वदेशी संरक्षण क्षमतेचे प्रतीक असलेली दीर्घ पल्ल्याची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन हे संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
याशिवाय गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आले. या सर्व बाबींमुळे ७७वे प्रजासत्ताक दिन संचलन अधिक भव्य, ऐतिहासिक आणि लक्षवेधी ठरले.
प्रजासत्ताक दिनी सहभागी होणाऱ्या विविध राज्यांच्या या चित्ररथांमधून भारताची संस्कृती आणि प्रगती दाखवली जाते. देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांमधून चित्ररथ निवडण्याची प्रक्रिया काही महिने आधीच सुरू होते. संरक्षण मंत्रालयाकडून अनेक फेऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर हे चित्ररथ सादर केले जातात.

