(धाराशिव / वृत्तसंस्था)
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या उपली बुरुजावरून पडून महिला कुस्तीपटू आणि तिच्या ५ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर ३ वर्षांच्या दोन जुळ्या मुली गंभीर जखमी झाल्या. गुरुवारी (दि. ३) दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मृत्यू झालेल्या अश्विनी मोहिते या शालेय जीवनात नावाजलेल्या कुस्तीपटू होत्या. त्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील रहिवासी होत्या.
अश्विनी मनोहर मोहिते-पौळ (२८, रा. अंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर) आणि त्यांचा मुलगा अजिंक्य पौळ (५) अशी मृतांची नावे आहेत. जुळ्या मुली वीरा आणि क्रांती या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अश्विनी यांचे माहेर उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथे आहे. शालेय जीवनापासूनच त्यांना कुस्तीची आवड होती. त्यांनी राज्यस्तरापर्यंतच्या कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या आवडीला आणि कारकिर्दीला वडील तानाजी मोहिते यांनी प्रोत्साहन दिले होते.
किल्ला पाहण्यासाठी आल्या अन् काळाचा घाला
अश्विनी मोहिते या गुरुवारी मुलगा आणि दोन मुलींसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. किल्ल्यातील उपली बुरुजावरून चौघेही खाली पडले. या दुर्घटनेत अश्विनी आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास त्या किल्ल्यातील सर्वांत उंच असलेल्या उपली बुरुजावर गेल्या. बुरुजाची उंची सुमारे १५० फूट आहे. तेथील एका छोट्या कमानीतून अश्विनी यांनी तीनही मुलांसह खाली उडी मारली, अशी चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमी मुलींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपघात की आत्महत्या? पोलिस तपासातून नेमकं कारण स्पष्ट होणार
अश्विनी मोहिते आणि त्यांच्या तीन मुलांचा उपली बुरुजावरून पाय घसरून पडले की अश्विनी यांनी मुलांसह आत्महत्या करण्यासाठी उडी मारली, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, अश्विनी या गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी व्हंताळ (ता. उमरगा) येथे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांच्याकडे राहत होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे मुंबई येथे रिक्षाचालक असल्याचे सांगितले जात आहे. अश्विनी या मुंबई मेट्रो पोलिसांत कार्यरत होत्या, असेही सांगितले जात आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. घटनेचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमागे कौटुंबिक कारण आहे की अन्य कोणते कारण आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

