(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात स्वतःच्या मोबाईलवर चित्रीकरण करत गुन्हेगाराचा धाडसी पाठलाग करून, हातखंबा येथील ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देणारा जाकादेवी विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. सर्वेश संदेश मायंगडे याचा मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी विद्यालयात आयोजित पालक सभेत जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रेरणादायी प्रसंगी जाकादेवी विद्यालयाच्या शिक्षकवृंदातर्फे सर्वेशला रोख ₹५ हजारांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्वेशचे वडील अर्धांगवायूने आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी ₹५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. अशा प्रकारे एकूण ₹१० हजारांची मदत करण्यात आली. या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन सुनील (बंधू) मयेकर, निमंत्रित संचालक चंद्रशेखर (बापू) मयेकर आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांनी योगदान दिले.
संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर यांच्या हस्ते सर्वेश व त्याच्या आईचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बालरंगभूमी, रत्नागिरी शाखेच्या वतीने सीमा कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनीही सर्वेशचा विशेष सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना सर्वेश म्हणाला, “चोरी करणाऱ्या व्यक्तीला पकडून द्यायचे, हा एकच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मी मोबाईलवर चित्रीकरण करत त्याचा पाठलाग केला.”
यावेळी बोलताना चेअरमन सुनील मयेकर यांनी सर्वेशच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करत, त्याला राज्य व राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी विद्यालयाच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची घोषणा केली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील, निमंत्रित संचालक विलास राणे, मुख्याध्यापक नितीन मोरे, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर, काजुर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष घाग, प्रभारी पर्यवेक्षक अरुण कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, सौ. सायली राजवाडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अर्जुन माचिवले, सुधाकर गोनबरे यांच्यासह शिक्षक, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी सुशांत नंदकिशोर गावडे व रविंद्र दत्ताराम माचिवले यांचा पोलीस खात्यात नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच डॉ. शशिकला वाडकर यांचा वैद्यकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
पालक सभेत विविध शैक्षणिक विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. उपस्थित पालकांनी आपल्या सूचना व मते मांडली. संस्थेचे संचालक किशोर पाटील, सचिव विनायक राऊत आणि चेअरमन सुनील मयेकर यांनी संस्थेची शैक्षणिक ध्येयधोरणे स्पष्ट करत धाडसी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी केले. सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी, तर आभार प्रदर्शन अरुण कांबळे यांनी केले.

