(तिरुपती / वृत्तसंस्था)
अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्ट देणगी चोरी प्रकरणापाठोपाठ आता भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याकडे पाच कोटींची माया जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. मेंडू लोकनाधम असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते तिरुमला तिरुपती देवस्थानचे (टीटीडी) उपकार्यकारी अधिकारी आहेत. लोकनाधम यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) टीटीडीच्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती एसीबीला दिली होती. या माहितीच्या आधारे एसीबीचे डीएसपी श्रीनिवास राव यांच्या नेतृत्वाखाली सात पथकांनी लोकनाधम यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले.
नेल्लूर एसीबी न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटनुसार हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. लोकनाधम यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या आरोपांच्या तपासाचा हा भाग आहे. मालमत्तेचे प्रमाण आणि त्यांचे स्रोत निश्चित करण्यासाठी एसीबीचे अधिकारी मालमत्तेची कागदपत्रे, सोने, आर्थिक नोंदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची तपासणी करत आहेत.
ही सापडली मालमत्ता
लोकनाधम यांच्या पत्नीच्या नावे घर आढळून आले आहे. तसेच दोन प्लॉटसह एक इमारत आणि वडमालापेटा मंडळाच्या पाडिरेडू आरण्यम गावातील प्लॉटही आढळला आहे.
मुलाच्या नावावरील श्रीनिवास नगरमधील प्लॉटची कागदपत्रेही एसीबीच्या तपासात आढळली आहेत. याशिवाय लोकनाधम आणि त्यांच्या मुलाच्या नावे चार मुदत ठेवी असल्याचे समोर आले आहे.
लोकनाधम यांच्या मेहुण्यांच्या घरी ३१.९८ लाख मूल्याच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. याशिवाय दोन किलो सोने, १२.५ लाख रुपयांची रोकड आणि ६.५ किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे.

