(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील भीषण अपघाताची धग अद्याप कायम असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक नमुना शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी पालीजवळील कापडगाव-नागलेवाडी परिसरात समोर आला. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेले प्लास्टिक आणि लोखंडी बॅलर (ड्रम) पार करताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट रस्त्यालगतच्या गटारात घुसला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक MH-09 FL-4423 हा जयगड (रत्नागिरी) येथून कोल्हापूरकडे निघाला होता. चालक निलेश रमेश पारकर (रा. कोल्हापूर) हा सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कापडगाव येथील लेनवरील तीव्र उतार आणि वळणाजवळ आला. वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेले प्लास्टिक व लोखंडी ड्रम पार करताना ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन आदळले.
या अपघातात चालकास कोणतीही दुखापत झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर हातखंबा पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून या घटनेनंतरही वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली. मात्र, या अपघाताने महामार्गावरील तात्पुरत्या सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत.
तीव्र उतार, मुसळधार पाऊस आणि त्यात अचानक समोर येणारे बॅलर यामुळे मोठ्या वाहनचालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. विशेषतः एखादे जड वाहन हे बॅलर चुकवण्याच्या प्रयत्नात अचानक बाजूला वळल्यास शेजारून जाणाऱ्या दुचाकी, कार किंवा इतर वाहनांना जोरदार धडक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच लांजा परिसरातील भीषण अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले होते. त्या घटनेतून धडा घेऊन महामार्गावरील धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी आणि वैज्ञानिक उपाययोजना होणे अपेक्षित असताना अद्याप तात्पुरत्या उपायांवरच भर दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

