(लांजा)
दागदागिने, पैसाअडका, वाहन चोरीला जाणे यात काही नवीन नाही. मात्र तालुक्यातील आंजणारी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे चक्क तीन लोखंडी साकवच चोरीला गेले आहेत. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग अनभिज्ञ असून, आंजणारी ग्रुप ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा यांना या साकव चोरीबाबत पत्र दिले आहे.
लांजा तालुक्यातील आंजणारी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मौजे नांदिवली, आंजणारी जोशीवाडी आणि पाष्टेवाडी येथील तीन लोखंडी साकव चोरीला गेले आहेत. या लोखंडी साकवांचा वापर स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यात वहाळाच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी होत होता. मात्र असे असतानाही ते चोरीला गेल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग या चोरीला गेलेल्या साकवांबाबत अनभिज्ञ असून, या प्रकरणी कोणतीही माहिती ग्रामपंचायतीला प्राप्त नसल्याने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशा मागणीचे निवेदन आंजणारी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा यांना सादर केले आहे.
हे लोखंडी साकव चोरीला गेलेच कसे? गावाबाहेरील कोणी भंगारवाला येऊन लोखंडी साकव चोरून घेऊन गेला आहे का? तसे असेल तर त्याला गावात कोणी मदत केली आहे? गावातीलच कोणी हे साकव भंगारवाल्याला विकले आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत. जिल्हा परिषद आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.