( लांजा )
तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर विलवडे ग्रामपंचायतीजवळ होळीचा मांड येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन महिला जखमी झाल्या. पाठीमागून आलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दिलेल्या जोरदार धडकेत दोन महिला गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. गंभीर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम सोमा राज्ये (५३, रा. विलवडे वाकीवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली. जयश्री जयवंत कोंडसकर, योगीता चंद्रकांत चौगुले आणि वासंती चंद्रकांत मालपेकर (तिन्ही रा. वाकेड गावकरवाडी) या महिला रोजच्या प्रमाणे मजुरीचे काम आटोपून शुक्रवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घरी परतत होत्या. शिरवली फाटा, विलवडे ग्रामपंचायत परिसरात रस्त्याच्या कडेला त्या चालत असताना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच ०१ ईजे ८५३५) तिघींना चिरडले.
या अपघातानंतर तिन्ही महिलांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी किरकोळ जखमी झालेल्या जयश्री कोंडसकर यांच्यावर उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी योगीता चौगुले व वासंती मालपेकर यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी स्विफ्ट डिझायर कार चालक नितीन चंद्रकांत परब (४७, रा. माहीम, मुंबई) याच्यावर भरधाव वेगाने कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.

