(लांजा)
सात वर्षीय बाल जलतरणपटू रेयांश खामकर याने पुन्हा एकदा आपल्या जलतरण कौशल्याची चमकदार झलक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत, रेयांशने मोठ्या जलतरणपटूंशी स्पर्धा करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
विशेष बाब म्हणजे, रेयांशने वयाने मोठ्या आणि अनुभवी जलतरणपटूंना मागे टाकत हे यश मिळवले आहे. त्यामुळे या पदकाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या बाल जलतरणपटूचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रेयांश खामकर याचे मूळ गाव लांजा तालुक्यातील आरगाव असून, त्याचे आजोबा चंद्रकांत खामकर हे तालुक्यातील एक परिचित सामाजिक कार्यकर्ते आहेत. यापूर्वीही रेयांशने मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी (विजयदुर्ग) या १५ किमी सागरी अंतराचा जलतरण प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. बालवयातच मिळवलेले हे यश प्रेरणादायी असून, रेयांशच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

