(लांजा /प्रतिनिधी)
राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ वेरवली येथील बुद्ध विहारात भव्यपणे संपन्न झाला. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यात आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या प्रवचन मालिकेचा संपूर्ण आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला.
समारंभाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाळा अर्पण आणि दीपप्रज्वलनातून झाली. तत्पूर्वी पंचाग प्रणाम करून पंचशील व सूत्रपाठाने कार्यक्रमाची विधी सुरू करण्यात आली. धम्म आणि विज्ञान या विषयावर प्रा. चंद्रकांत गोसावी यांनी प्रवचन दिले. त्यांनी सांगितले की, धम्म म्हणजे विज्ञान आणि विज्ञान म्हणजे धम्म. भगवान बुद्धांनी माझ्या धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे असे सांगितले. माणसाने सत्य स्वीकारले तर त्याची प्रगती होते.
कार्यक्रमात आर. बी. कांबळे (अध्यक्ष, लांजा), विद्याधर कदम (अध्यक्ष, गुहागर), सुरेश जाधव (प्रतिनिधी, रत्नागिरी), संजीवन सावंत (कोषाध्यक्ष, संगमेश्वर), डी. एन. मोरे (प्रतिनिधी, खेड), अनिल घाडगे (अध्यक्ष, दापोली), शैलेश पवार (उपाध्यक्ष, संस्कार विभाग) यांनी आपल्या तालुक्यातील वर्षावास कार्यक्रमांचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, सचिव संस्कार विभाग महाराष्ट्र एन. बी. कदम, जिल्हा सरचिटणीस प्रदीप जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष जनार्दन मोहिते आणि उपाध्यक्ष प्र. पर्यटन विभाग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सर्व तालुक्यांनी वर्षावासाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले असल्याचे कौतुक केले. प्रवचनकारांनी उत्तम मार्गदर्शन करून धम्माचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल मान्यवरांनी प्रशंसा केली. यावेळी परिक्षा उत्तीर्ण बौद्धाचार्य, तालुका शाखा आणि प्रवचनकारांना अनंत सावंत, सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ (सचिव, संस्कार विभाग) यांनी केले, तर आभार रविंद्र जाधव (अध्यक्ष, वेरवली) यांनी मानले. जिल्हा, तालुका व ग्रामशाखा पदाधिकारी, बौद्धाचार्य, मा. श्रमणेर, शिक्षक-शिक्षिका, सैनिक, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका लांजा व ग्रामशाखा वेरवली यांनी कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी करून उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले, ज्यामुळे वर्षावास समारंभ यशस्वी झाला.

