(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांविरोधात सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला लांजा तालुका बौद्धजन मंडळ (ग्रामीण/मुंबई) यांनी पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी लांजा तहसीलदार प्रियांका ढोल यांची भेट घेऊन केंद्र सरकारकडे मागण्या पोहोचविणारे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षा आणि ‘नीट’सह विविध केंद्रीय परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरत असून अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बौद्धजन मंडळाने निवेदनात केंद्र सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक संवाद साधावा, अशी मागणी केली आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली असून, तोडगा काढण्यासाठी त्वरित पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देवधेकर, अनिरुद्ध कांबळे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष लहू कांबळे, सरचिटणीस सचिन जाधव, भिकाजी देवधेकर, सल्लागार प्रभाकर कांबळे, अनोज कांबळे, गौतम कांबळे, अशोक कांबळे, हनुमंत कदम, आर. बी. कदम, शिवाजी कांबळे, सकपाळ, प्रशांत कदम, एस. एम. कांबळे, विलास कोटकर यांच्यासह तालुक्यातील बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

