(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उन्हाच्या कडकडाटानंतर मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या मेघगर्जनेसह पावसाने रत्नागिरीकरांना अक्षरशः गाफील ठेवले. काल लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कोसळलेल्या या पावसामुळे बाजारपेठांतील दिवाळीच्या खरेदीचा उत्साह ओसरला. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि कोसळणारा पाऊस यामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
हवामान खात्याने मान्सून परतल्याची घोषणा आधीच केली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कोकणात ‘परतीच्या पावसाचे सावट कायम आहे. दिवसाढवळ्या प्रखर ऊन आणि सायंकाळी कोसळणारा मुसळधार पाऊस असा खेळ सुरू राहिल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी दोघेही हैराण झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. पण, या परतीच्या पावसाने बळीराजाच्या माथी नवीन संकट आणले आहे. भाताच्या लोंब्यांत दाणे तयार झालेले असतानाच पावसाने कापणीला खीळ बसवली आहे. अनेक ठिकाणी कापलेले धान चिखलात अडकले असून, काही ठिकाणी ठेवलेले भाताचे भारे ओले होऊन नासाडीच्या मार्गाने गेले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे काही शेतांतील पिके अक्षरशः जमिनीत लोळून पडली आहेत. भात कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संकट आणखी तीव्र झाले आहे. दिवाळीच्या उंबरठ्यावर हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेईल की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. रायगड, रत्नागिरी आणि आसपासच्या भागात “पावसात भिजलेली शेतं, चिंतेत बुडालेले शेतकरी” असे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे.
तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी
या वर्षी ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी धैर्याने खरिप हंगाम हाती घेतला होता. मात्र, परतीच्या पावसाने उरलेसुरले पीकही उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजाची दिवाळी पुन्हा एकदा शेतातच अडकली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत आणि पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

