(गावखडी / वार्ताहर)
“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या निनादात आणि फुलांनी सजवलेल्या माळांमध्ये गणेशभक्तांचे उत्साही चेहरे उजळले आहेत. गणेश चतुर्थीपूर्वीच, हरतालिका तृतीयेला अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्याचा मान मिळवला.
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावात मंगळवारी गणेशमूर्तींचे आगमन अगदी वाजतगाजत झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ आणि पावसाची शक्यता टाळण्यासाठी भक्तांनी एक दिवस आधीच बाप्पाला घरी आणणे पसंत केले.
दरम्यान, गणरायाच्या पूजेच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्याने रत्नागिरीची बाजारपेठ फुलून गेली आहे. पूजा साहित्य, सजावटीसाठी फुले, केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, शमीपत्र तसेच फुलपात्रींना मोठी मागणी आहे. तर प्रसादासाठी पेढे आणि मोदकांच्या खरेदीतही उत्साह दिसून आला असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या आगमनाने ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून घरोघरी गणरायाच्या स्वागताची लगबग दिसत आहे.
(Photo : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे हरतालिका तृतीयेला गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणतानाचे छायाचित्र)
छायाचित्रकार – दिनेश पेटकर, गावखडी

