(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होळी स्पेशल गाड्यांना होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. दिवा-चिपळूण दरम्यान अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, १ ते ८ मार्च या कालावधीत ही विशेष गाडी धावणार आहे.
दिवा येथून रात्री ११.२५ वाजता सुटणारी मेमू स्पेशल दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात चिपळूणहून दुपारी ३.३० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे आगमन होईल. या गाडीला निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि आंजणी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मडगाव–एलटीटी आरक्षित स्पेशलचीही घोषणा केली आहे. १ ते ८ मार्चदरम्यान धावणारी ही गाडी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगावला आगमन होईल.
२० डब्यांची ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर-रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, चिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबणार आहे. याशिवाय, शिमगोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी आणि एलटीटी–सावंतवाडी या पहिल्या दोन होळी स्पेशल गाड्या २६ फेब्रुवारीपासून कोकणवासीयांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. प्रत्येकी चार फेऱ्या धावणाऱ्या या स्पेशलमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
सीएसएमटी–सावंतवाडी साप्ताहिक होळी स्पेशल २६ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान धावेल. सीएसएमटीहून रात्री १२.३० वाजता सुटणारी ही गाडी त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडीहून सायंकाळी ५.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी येथे आगमन होईल. या स्पेशलला २२ डबे जोडण्यात आले आहेत. शिमगोत्सवाच्या निमित्ताने कोकण रेल्वेमार्गावर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केल्याने चाकरमान्यांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत होत आहे.

