(रत्नागिरी)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाची बैठक सोमवारी आरटीओ कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस ऑटोरिक्षा संघटना, बस वाहतूकदार, एसटी महामंडळ तसेच वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी रिक्षाचालकांना प्रवाशांकडून अवाजवी भाडे न आकारण्याचे, नम्रतेने वर्तन करण्याचे आणि नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले.
बस वाहतूकदारांना वाहनांतील आपत्कालीन दरवाजे व अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याचे, तसेच चालकांनी मद्यप्राशन, थकवा किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये, याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले. एसटी महामंडळाला रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बस फेऱ्यांचे नियोजन करण्याचे सुचविण्यात आले.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले. “गणेशोत्सवात कोकणात भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या प्रवासात सुरक्षितता, सोय आणि अडथळामुक्त व्यवस्था राहावी यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे,” असे आवाहन या वेळी करण्यात आले.
बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, मोटार वाहन निरीक्षक, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक शरद घाग, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर जाधव, रेल्वे पोलीस वरिष्ठ निरीक्षक सतीश विभुते, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, तसेच रस्ता कंत्राटदारांचे प्रतिनिधी, बस वाहतूकदार संघटना, जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी व रुग्णवाहिका सेवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

