(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील नागलेवाडीच्या उतरातील वळणावर वेगांवर नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात आज (मंगळवार दि. 31 डिसेंबर 2024) सकाळी सवा अकराच्या सुमारास झाला. सुदैवाने अपघातामध्ये कंटेनरची इतर वाहनांना धडक बसली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हातखंबा ते पाली ह्या भागात कासवाच्या गतीने काम सुरू आहे. याच भागातील चौपदरीकरणाच्या काही तुकड्यात मार्गिका तयार करून वाहतुकीस खुल्या देखील करण्यात आल्या आहेत. मात्र खुल्या करण्यात आलेल्या मार्गिकेवरून गाड्या प्रचंड वेग धारण करून मार्गक्रमण करत असतात. अशाच प्रकारे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर ( गाडी क्र. MH -03-CV-5092 ) हा मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास नागलेवाडी येथील अवघड वळनावर आला असता चालक दिलीप कुमार पटेल (राहणार सिद्धांत नगर, पूर्ण पत्ता मिळू शकलेला नाही ) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट विरुद्ध दिशेच्या मार्गीकेवर जाऊन पलटी होऊन अपघात झाला. कंटेनर पलटी होताच डिझेल टँकमधील डिझेल रस्त्याच्या बाजूला पसरले. सुदैवाने अपघातग्रस्त कंटेनरची धडक इतर कोणत्याही वाहनाला बसली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. परंतु या अपघातात चालकांच्या केबिनचा चक्काचूर झाल्याने केबिनमधील चालकाला गंभीर दुखापत झाली. तसेच कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील श्री नरेंद्रचार्य महाराज नाणीज धामची रुग्णवाहिका दाखल झाली. तत्काळ स्थानिकांच्या सहाय्याने जखमी कंटेनर चालकाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी हातखंबा वाहतूक केंद्राचे पोलीस, पाली पोलीस ठाण्याचे पोलिस दाखल झाले होते. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.