(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास अखेर केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) अधिकृत मंजुरी दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हे विद्यालय कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत (प्रत्येक वर्गासाठी एक तुकडी) अध्यापन सुरू करण्यात येणार आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या १७ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, भारत सरकारने २७ डिसेंबर २०२४ मध्ये देशभरात मंजूर केलेल्या ८५ नवीन केंद्रीय विद्यालयांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय, नाचणे हे एक आहे.
संबंधित प्रायोजक संस्थेकडून विद्यालयासाठी आवश्यक जमीन हस्तांतरित करण्यात आली असून, तात्पुरत्या इमारतीची उपलब्धताही सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यालय सुरू करण्यास औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नाचणे (रत्नागिरी – पिन ४१५६३९) येथे तात्पुरत्या एका इमारतीत विद्यालयाचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. या विद्यालयाला विद्यालय कोड २५५१ प्रदान करण्यात आला आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनेने स्पष्ट केले आहे की, प्रारंभी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण सुरू होईल. त्यानंतर आवश्यक सुविधा, मान्यता आणि उपलब्धतेनुसार पुढील वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. तसेच प्रवेश प्रक्रिया, जमीन हस्तांतरण आणि तात्पुरत्या इमारतीच्या अधिग्रहणाशी संबंधित उर्वरित औपचारिकता (असल्यास) ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग संसदीय मतदारसंघातील विद्यार्थी व पालकांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

