(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे ₹७,५०० कोटींच्या गुंतवणुकीतून ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प, सी-प्लेन सेवा, शिपयार्ड आणि सीएनजी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निबे इंडिया लिमिटेडचे संचालक गणेश निबे, एआयआयएफएचे संचालक योगेश मंदानी आणि व्हीआयटी सेमिकॉन पार्क लिमिटेडच्या संचालिका ईश्वर्या कन्नन यांच्यासह विविध उद्योजक उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले की, जिल्ह्यासाठी संरक्षण क्षेत्र, पर्यटन, हरित ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्राला प्राधान्य देत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
₹७,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ₹७,५०० कोटींच्या गुंतवणुकीतून दोन ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यापैकी एक प्रकल्प राजापूर येथे, तर दुसरा रत्नागिरी परिसरात उभारला जाणार आहे.
पर्यटनासाठी सी-प्लेन सेवा
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील वर्षभरात सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून, ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्राला चालना; शिपयार्ड उभारणार
संरक्षण क्षेत्राशी संबंधित मोठी औद्योगिक यंत्रणा जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, समुद्रकिनारी वाटद किंवा परिसरात शिपयार्ड उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
सीएनजी प्रकल्प लवकरच
रत्नागिरीसाठी महत्त्वाचा ठरणारा सीएनजी प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, तो जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.
सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या आराखड्यात बदल
पूर्वी प्रस्तावित असलेल्या ₹३८,००० कोटींच्या व्हीआयटी सेमीकंडक्टर प्रकल्पाला अमेरिकेतील काही घडामोडींमुळे विलंब झाला असून, प्रकल्पाच्या व्याप्तीत बदल करण्यात आला आहे. आवश्यक तेवढीच जमीन या प्रकल्पासाठी देऊन उर्वरित जमीन इतर नवीन उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली.
या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहतील, स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

