( विशेष /प्रतिनिधी )
पालकमंत्री उदय सामंत यांच्या होमग्राउंडवर अखेर सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेने अर्थात ‘त्यांच्याच पट्ट्याने’ मैदान मारत बाजी मारली आहे. हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटातील अटीतटीच्या, हायव्होल्टेज आणि प्रतिष्ठेच्या लढतीत अपक्ष उमेदवाराने उभी केलेली तगडी झुंज आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर मात करत शिंदेंच्या शिवसेनेचे सुयोग कांबळे काठावरच्या फरकाने विजयी झाले. हा विजय जरी सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात गेला असला, तरी सामंत यांच्या होमग्राउंडवर शेवटपर्यंत रंगलेली ही लढत सत्तेची ताकद आणि मर्यादा दोन्ही उघड करणारी ठरली आहे. या निकालाने सामंतांची प्रतिष्ठा वाचली असली, तरी लढतीची तीव्रता शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती.
या गटात अनुसूचित जातीसाठी आरक्षण, बंडखोरी, जातीय समीकरणे आणि मतविभाजन यामुळे निवडणूक अधिकच गुंतागुंतीची बनली होती. सत्ताधारी शिवसेनेतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या परशुराम कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत या दोन्ही उमेदवारांनी सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, अखेर पालकमंत्र्यांचा प्रभाव, संघटनात्मक ताकद आणि शेवटच्या टप्प्यातील रणनीती निर्णायक ठरली आहे. निवडणूक निकालानुसार सुयोग कांबळे यांना ६,०४६ मते, तर परशुराम कदम यांना ५,७३८ मते मिळाली आहेत. या दोघांमधील मतफरक अत्यल्प राहिल्याने ही लढत किती चुरशीची होती, याचे स्पष्ट प्रतिबिंब निकालातून उमटले आहे.
दरम्यान, या अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सत्ताधारी आणि अपक्ष अशा दोन्ही प्रमुख उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला. या लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुकुंद सावंत हे सत्ताधारी आणि अपक्ष अशा दोन्ही प्रमुख उमेदवारांसाठी सातत्याने डोकेदुखी ठरत होते. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची उपस्थिती, स्वतंत्र मतदारवर्गावर असलेली पकड आणि मतविभाजनाची शक्यता यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी धोका अधिक होता. तुलनेने कमी मते मिळूनही, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुकुंद सावंत यांची एन्ट्री निकालाचे गणित बदलणारी ठरली असून, तरी त्यांच्या मतांनी या चुरशीच्या लढतीचा तोल कुठल्या बाजूला झुकला, यामध्ये निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुकुंद सावंत यांना मिळालेली ६१५ मते निर्णायक ठरली आहेत. सावंत यांची मते अपक्ष उमेदवाराकडे वळली असती, तर निकालाचे चित्र बदलले असते, अशी देखील चर्चा चौकाचौकात सुरू आहे. नोटाला १६३ मते पडली असून, एकूण १२,५६२ मतदान या गटात झाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेत सक्रिय असलेले परशुराम कदम यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये स्पष्ट मतविभाजन झाले. तरीही, ही नाराजी झेलत सुयोग कांबळे यांनी विजय मिळवला, हा निकाल थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय नेतृत्वाचा आणि काही प्रमाणात संघटनात्मक ताकदीचा कौल मानला जात आहे. या विजयामुळे सुयोग कांबळे यांची राजकीय वाटचाल मजबूत झाली असून, ही निवडणूक त्यांच्या राजकीय भवितव्याची कसोटी ठरली होती.
तसेच या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या उपस्थितीचा फटका थेट शिंदेंच्या शिवसेनेलाही बसल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. सत्ताधारी पक्षाचे पारंपरिक मतदार अपक्ष उमेदवाराकडे वळल्याने शिवसेनेच्या मतांमध्येही फूट पडल्याचे दिसून आले. परिणामी, सत्ताधारी पक्षाचा विजय जरी साध्य झाला असला, तरी तो अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी फरकाने मिळाल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या होमग्राउंडवर अवघ्या सुमारे तीनशे मतांनी मिळालेला विजय हा सत्ताधारी शिवसेनेसाठी यशापेक्षा अधिक इशाराच मानला जात आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचे होमग्राउंड असूनही मतदारांमध्ये नाराजी, अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीचे प्रतिबिंब इतक्या कमी फरकातून दिसून येत असल्याने, भविष्यातील निवडणुकांसाठी ही परिस्थिती धोक्याची घंटा ठरू शकते, असा स्पष्ट संदेश या निकालातून दिला गेला आहे. हा विजय जरी शिंदेंच्या शिवसेनेच्या पारड्यात गेला असला, तरी मतविभाजन आणि उमेदवाराने घेतलेल्या मतांचा आकडा, आगामी काळात संघटनात्मक बांधणी आणि नाराजी दूर करण्याचे आव्हान सामंतांसमोर उभे राहिले आहे.
वंचित आणि शिंदेशिवसेनेची मते फुटून लढत चुरशीची
निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये स्पष्ट फूट पडल्याचे चित्र निकालातून पुढे आले आहे. तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवाराच्या उपस्थितीमुळे सत्ताधारी शिवसेनेची पारंपरिक मते काही प्रमाणात विभागली गेली, तर वंचित बहुजन आघाडीसह पाठिंबा दिलेल्या पक्षाची मते अपेक्षेप्रमाणे एकवटून न राहता विविध दिशांना विखुरली गेल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने प्रचारात आक्रमक भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्ष मतदानात त्या मतांचे रूपांतर विजयासाठी आवश्यक असलेल्या संख्येत झाले नाही. मात्र, त्यांच्या मतांनी अपक्ष उमेदवार परशुराम कदम, शिंदेशिवसेनेचे सुयोग कांबळे या प्रमुख उमेदवारांचे गणित बिघडवत निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित ठेवला. परिणामी, वंचितची भूमिका ही जरी दुय्यम वाटत असली, तरी निर्णायक प्रभाव टाकणारी ठरली असल्याचे आता बोलले जात आहे. एकूणच, या निकालातून मतविभाजन हा निर्णायक घटक ठरल्याचे स्पष्ट झाले असून, विजय–पराभवाच्या पलीकडे जाऊन वंचित बहुजन आघाडी आणि शिंदेंच्या शिवसेनेला आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचा संदेश मतदारराजाने दिल्याचे चित्र आहे.
जिंकता जिंकता हुकले पण परशुराम कदमांनी सत्ताधाऱ्यांचे गणित ढवळले
अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचा पराभव जरी झाला असला, तरी त्यांच्या उमेदवारीने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण दिले. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांच्या पारंपरिक मतगणितात खळबळ उडवणारा घटक म्हणून परशुराम कदम यांची भूमिका ठळकपणे पुढे आली आहे. परशुराम कदम यांनी प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्नांना हात घालत, यापूर्वी केलेली विकास कामे असे मुद्दे हाताळले. या मुद्द्यांमुळे केवळ नाराज मतदारच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे पारंपरिक समर्थकही त्यांच्या बाजूने वळले. परिणामी, शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. निकाल पाहता, परशुराम कदम यांना मिळालेली मते ही केवळ अपक्ष उमेदवाराची ताकद दर्शवणारी नसून, सत्ताधारी पक्षाविषयी असलेली अस्वस्थता आणि बदलाची सुप्त मागणी व्यक्त करणारी ठरली आहे. विजयापासून ते केवळ काहीशे मतांनी दूर राहिले. विशेषतः लक्षकेंद्रित करणारी बाब अशी की, पालकमंत्री उदय सामंत यांच्या होमग्राउंडवरच परशुराम कदम यांनी दिलेली झुंज, ही सत्ताधारी यंत्रणेसाठी इशाराच मानली जात आहे. अपक्ष उमेदवार असूनही त्यांनी निर्माण केलेले आव्हान, भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम घडवू शकणारे असल्याचे संकेत मिळत आहेत.

