(मालगुंड / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे प्राणीप्रेम आणि माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन घडले. प्रसूतीदरम्यान गंभीर अवस्थेत अडकलेल्या एका भटक्या गायीवर वेळेवर उपचार करून तिच्यासह नवजात वासराचे प्राण वाचवण्यात प्राणीमित्रांना यश आले. या घटनेमुळे परिसरात या सर्वांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
मालगुंड येथील विठ्ठल मंदिर परिसरात एका भटक्या गायीला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने गाय अत्यंत गंभीर अवस्थेत होती. वेळेत मदत मिळाली नसती तर गाय आणि तिच्या पोटातील वासराचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे शल्यचिकित्सक डॉ. स्वरूप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन सहाय्यक निलेश वाघमारे तसेच दिलीप बापट, सदानंद केळकर, उमेश केळकर, भूषण खरे, राजू खरे आणि शांताराम झोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समन्वयातून आवश्यक उपचार करण्यात आले आणि सुरक्षित प्रसूती घडवून आणण्यात यश आले.
या प्रयत्नांमुळे गायीसह नवजात वासराचे प्राण वाचले. उपचारानंतर गायीची प्रकृती स्थिर असून तिची योग्य देखभाल व्हावी यासाठी तिला जबाबदार व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आले.
आजच्या काळात प्राण्यांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत असताना मालगुंडमधील या प्राणीमित्रांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. निःस्वार्थ भावनेने केलेल्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून सर्व प्राणीमित्रांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

