(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भाट्ये येथील रत्नसागर रिसॉर्टच्या नुकसानभरपाई प्रकरणात जिल्हा न्यायालयाने पुन्हा एकदा जप्ती कारवाईसाठी मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत २४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून, या निकालाकडे जिल्हा प्रशासनासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
मे २०२१ मध्ये जिल्हा प्रशासनाने रत्नसागर रिसॉर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मुदतीपूर्वी रिसॉर्ट बंद झाल्याने मालक प्रतापसिंह सावंत यांनी न्यायालयाची धाव घेतली. त्यांनी न्यायालयात आपले तब्बल ९ कोटी २५ लाखांचे नुकसान झाल्याचे सादर केले. या दाव्यानंतर न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. अन्यथा प्रशासनाची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे निर्देशही दिले होते.
याच आदेशानुसार ४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या आणि संगणक बाहेर काढण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने तत्काळ न्यायालयाकडून १६ एप्रिलपर्यंत स्थगिती मिळवली. त्यानंतर १० जून रोजी झालेल्या सुनावणीत जप्ती प्रकरणाला २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
उच्च न्यायालयात धाव, प्रतिज्ञापत्राची मुदत
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले. उच्च न्यायालयाने प्रशासनाला १६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत दिली. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाने जप्ती प्रकरणात २३ जुलैपर्यंत मुदत वाढवली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत ती मुदत आता २४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणामुळे प्रशासन, न्यायालय आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील सुनावणीला या वादाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

