(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कनकाडी (गोताडवाडी) येथील १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या तळी बांधकामाच्या कामात कथित अनियमिततेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने केलेल्या फेरमूल्यांकनात मोठी तफावत उघड झाली आहे. या अहवालाच्या आधारे ग्रामपंचायतीने संबंधित कंत्राटदाराकडून ४९ हजार ६७४ रुपयांची जादा अदा झालेली रक्कम वसूल केली असून, या कारवाईमुळे गावातील विकासकामांच्या पारदर्शकतेबाबत नवा संदेश गेला आहे.
कनकाडी गोताडवाडी येथे १५ व्या वित्त आयोगातून तळी बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या कामासाठी सुरुवातीला २ लाख २५ हजार रुपये अदा करण्यात आले होते. मात्र, या कामाच्या दर्जाबाबत तसेच मूल्यांकन प्रक्रियेबाबत ग्रामस्थ विकास बारकू गुरव यांनी आक्षेप नोंदवत फेरतपासणीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत कायदेशीर मार्गाचा अवलंब केला.
या तक्रारीची दखल घेत उपविभागीय प्रशासनाच्या आदेशानुसार संबंधित कामाचे फेरमूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेत प्रत्यक्ष कामाचे मूल्य १ लाख ६५ हजार २१७ रुपये इतकेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंत्राटदाराला ४९ हजार ६७४ रुपये अधिक अदा झाल्याचे स्पष्ट झाले. फेरमूल्यांकनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्मल ग्रामपंचायत, कनकाडीने संबंधित कंत्राटदाराला जादा रक्कम सात दिवसांत परत जमा करण्याची नोटीस बजावली. त्यानुसार कंत्राटदाराने ४९ हजार ६७४ रुपये ग्रामपंचायतीच्या स्वनिधी खात्यात जमा केले असून, १० जुलै २०२६ रोजी त्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आंदोलक विकास बारकू गुरव यांनी सांगितले की, गावातील विकासकामांमध्ये सार्वजनिक निधीचा योग्य वापर होणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. फेरमूल्यांकनातून जादा रकमेची वसुली होणे हा वैयक्तिक विजय नसून गावातील पारदर्शक प्रशासनाचा विजय आहे. भविष्यातही विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्यास त्याविरोधात कायदेशीर लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, सार्वजनिक निधीच्या वापरावर नागरिकांनी सजगपणे लक्ष ठेवले तर विकासकामांमध्ये अधिक पारदर्शकता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

