(लांजा / वार्ताहर)
लांजा तालुक्यातील बेनी खुर्द बौद्धवाडी येथे ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, १४ जुलै रोजी घडली. संतोष विजय धनावडे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धनावडे हे १४ जुलै रोजी आपल्या बेनी खुर्द येथील राहत्या घरी होते. सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील लोखंडी बारला कापडी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
वैद्यकीय अहवालानुसार, गळफासामुळे गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. क्र. ३७/२०२६) करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत पुढील कार्यवाही सुरू आहे.
संतोष धनावडे यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, लांजा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

