( रत्नागिरी / वार्ताहर )
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारी यंदाही उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. दोन दिवसांत तब्बल ३३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ३० हून अधिक सायकलपटूंनी विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेतला. पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि विठ्ठलभक्तीचा संदेश देणाऱ्या या वारीत सहभागी सायकलपटूंना पंढरपुरात विशेष सन्मानही करण्यात आला.
रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरातून वारीला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सायकलपटूंनी उंब्रज (भोसलेवाडी) येथे मुक्काम केला, तर दुसऱ्या दिवशी उंब्रज ते पंढरपूर असा प्रवास पूर्ण करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारीची सांगता झाली. क्लबच्या ३० हून अधिक सदस्यांसह त्यांच्या कुटुंबातील सुमारे २० जणांनीही या भक्तिमय उपक्रमात सहभाग नोंदविला.
शेनवडी येथील घोडके कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सायकल वारकऱ्यांचे धपाटे, दही, उसळ आणि ठेचा अशा पारंपरिक भोजनाने स्वागत केले. तसेच उंब्रज येथील श्री गोपाळनाथ मंदिरात ग्रामस्थ, बालवारकरी आणि मान्यवरांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात सायकल वारकऱ्यांचा सत्कार केला.
पंढरपुरात पोहोचल्यानंतर क्लबच्या सदस्या आणि गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांनी गायनसेवा सादर केली. याचवेळी ९० दिवसांच्या सायकलिंग चॅलेंजमध्ये यशस्वी सहभागाबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सदस्यांचा पदक देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभरातून आलेल्या चार हजारांहून अधिक सायकल वारकऱ्यांनी सहभागी होत साकारलेले गोल रिंगण हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
वारीतील सहभागी सदस्यांनी हा प्रवास केवळ सायकलिंग नसून श्रद्धा, जिद्द, मैत्री, सहकार्य आणि आत्मिक समाधान देणारा अनुभव असल्याच्या भावना व्यक्त केल्या. आंबा घाटातील आव्हानात्मक चढ, वाटेत ग्रामस्थांनी केलेले आत्मीय स्वागत, सहकाऱ्यांची साथ आणि विठुरायाच्या दर्शनाचा आनंद यामुळे हा प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
१७ वर्षांच्या युवतीपासून ७४ वर्षीय ज्येष्ठांचा उत्साह
या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १७ वर्षीय पूजा कोसुंबकर आणि ७४ वर्षीय गजानन भातडे यांनीही संपूर्ण सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या सहभागामुळे वारीला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
वारीत सहभागी सायकल वारकरी
या वारीत क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, खजिनदार योगेश मोरे, कार्यकारिणी सदस्य प्रसाद देवस्थळी, विशाल भोसले, ओंकार फडके, तसेच योगेश सामंत, प्रसाद खेडेकर, राकेश होरंबे, वरद चुनेकर, अमित पोटफोडे, अक्षय पोटफोडे, विकास कांबळे, नारायण पाटोळे, गजानन भातडे, ज्ञानेश्वर पांडे, मृणाल वाडेकर, पूजा कोसुंबकर, विनायक पावसकर, किरण चुंबाळकर, अमित जोशी, तृणाल येरूणकर, निलेश शाह, मंगेश शिंदे, राहुल भोसले, अथर्व शेंड्ये, संतोष तावडे, विनायक कुऱ्हाडे, तेजस ढवळे आणि ॲड. सचिन नाचणकर यांनी सहभाग घेतला.
सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी झालेल्या या सायकल वारीने केवळ विठ्ठलभक्तीच नव्हे, तर पर्यावरणपूरक प्रवास, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

