(राजापूर / वार्ताहर)
इतिहास, कला-संस्कृती आणि ‘मंदिरांचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या रायपाटणच्या विकासात आणखी एका महत्त्वाच्या सुविधेची भर पडली आहे. आज गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी रायपाटण येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आगटे पेट्रोल पंपाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या पेट्रोल पंपाचे उद्घाटन अस्मिता विष्णू आगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनानंतर वाहनधारकांनी नव्या सुविधेचे स्वागत करत मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी केली. ओणी-अणुस्कुरा मार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रायपाटणमध्ये इंधन सेवा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांची दीर्घकाळची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी या परिसरातील वाहनचालकांना इंधनासाठी कोळवण खडी येथील पंपावर अवलंबून राहावे लागत होते.
या पंपाचे संचालक सत्यवान विष्णू आगटे यांच्या मातोश्री अस्मिता विष्णू आगटे यांच्या हस्ते पेट्रोल विभागाचे, तर त्यांचे मामा कामतेकर यांच्या हस्ते डिझेल विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास रायपाटणचे सरपंच निलेश चांदे, उपसरपंच विजय जड्यार, माजी सरपंच राजेश नलावडे, श्री वडची आई देवस्थान न्यासाचे अध्यक्ष विनायक शेट्ये, आप्पा शेट्ये, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आण्णा पाथरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन नारकर, माजी सभापती दत्ताराम गोरुले, संदीप कोलते, मनोज गांगण, विलास गांगण, भास्कर सुतार, संदीप बारसकर, बाजीराव विश्वासराव, आप्पा साळवी यांच्यासह रायपाटण आणि पूर्व विभागातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, देवस्थानांचे मानकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पेट्रोल पंपामुळे परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांनाही बळकटी मिळणार आहे. या उपक्रमामुळे रायपाटणच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी सत्यवान आगटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

