(चिपळूण)
जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये व्हीलचेअर, रॅम्पसह दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अपंग, वयोवृद्ध तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त लाभार्थ्यांना शासकीय पेन्शन मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना आणि इतर शासकीय व निमशासकीय योजनांतील पेन्शनचे वितरण पूर्वीप्रमाणे पोस्टामार्फत घरपोच करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना त्यांच्या शुक्रवार, १७ जुलै रोजीच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुकादम यांनी दिली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अपंग, वयोवृद्ध, कर्करोगग्रस्त तसेच इतर लाभार्थ्यांना पेन्शन काढण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागते. यासाठी प्रवासाचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. शिवाय अनेक बँकांमध्ये व्हीलचेअर, रॅम्प आणि इतर आवश्यक सुविधा नसल्याने लाभार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संवेदनशील भूमिका घेत शासकीय पेन्शनचे वितरण पुन्हा एकदा पोस्ट विभागामार्फत गावोगावी घरपोच करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शौकत मुकादम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

