(पाली / वार्ताहर)
ग्रामीण रुग्णालय पाली येथे आज (बुधवारी) मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी तसेच ग्रामीण रुग्णालय पालीचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
सदर शिबिरामध्ये रक्तदाब व मधुमेह तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी, स्तन व गर्भाशयमुख (Breast and Cervical) कर्करोग तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जेरियाट्रिक केअर, पॅलिएटिव्ह केअर, बालरोग तपासणी, प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे, ईसीजी, तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) यांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय डायलिसिस सुविधेबाबत माहिती व विविध आरोग्यविषयक समुपदेशनही करण्यात आले.
या शिबिराचा १५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. विविध आजारांचे निदान, उपचाराबाबत मार्गदर्शन आणि शासकीय आरोग्य योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण रुग्णालय पालीचे अधीक्षक डॉ. विकास कुमरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सचिन साळुखे, डॉ. संजय श्रीखंडे, रेडिओलॉजिस्ट डॉ. नजिम बोरकर, दंतचिकित्सक डॉ. बडवे, नेत्रचिकित्सा अधिकारी मैथिली मॅडम तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

