(मुंबई)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता 48 हजार कोटी रुपयांची जुनी कृषी वीजबिले माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्याच्या निर्णयाचाही पुनरुच्चार त्यांनी केला.
भाजप प्रदेश समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सातत्याने निर्णय घेत असल्याचे सांगितले.
48 हजार कोटींची जुनी वीजबिले माफ
मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपधारकांची वीजबिले यापूर्वीच माफ करण्यात आली आहेत. आता शेतकऱ्यांच्या नावावरील सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी थकबाकीही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जुनी देणी संपुष्टात येतील आणि त्यांना नव्याने उभे राहण्याची संधी मिळेल.”
2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय
कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता हा निर्णय घेतला आहे. “आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करत आहोत. काही लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाची परतफेड करण्याची गरज राहणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही दिलासा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यापूर्वी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही”
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफी हा शेतकरी समस्यांवरील अंतिम उपाय असू शकत नाही. “दर सात-आठ वर्षांनी कर्जमाफी करावी लागत असेल, तर शेती क्षेत्रातील मूलभूत प्रश्न सोडविण्याची गरज आहे. कर्जमाफीमुळे कोणी श्रीमंत होत नाही. शेतकरी स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेतीत शाश्वत सुधारणा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

