(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत सायबर सिक्युरिटी व सायबर लॉ तज्ज्ञ ॲड. अमित नागवेकर यांनी सुमारे २० दिवसांपूर्वी स्विगी व झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मना कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटिसीची प्रत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) महाराष्ट्र तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) यांनाही पाठविण्यात आली होती. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवस्थेसंदर्भात कठोर नियमावली जारी केली आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आलेल्या या नियमांनुसार, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर कार्यरत सर्व खाद्य व्यावसायिकांकडे वैध एफएसएसएआय परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खाद्यपदार्थांची स्वच्छता, सुरक्षित हाताळणी आणि टॅम्पर-प्रूफ पॅकेजिंगचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांमधील ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबी, परवाना प्रणाली आणि अन्नसुरक्षेच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित करत ॲड. अमित नागवेकर यांनी कायदेशीर पातळीवर पाठपुरावा सुरू केला होता. त्यांची नोटीस संबंधित केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांकडेही पाठविण्यात आली होती.
सायबर लॉ क्षेत्रातील अभ्यासू म्हणून ओळख असलेले ॲड. नागवेकर हे सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ग्राहकांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले जाते. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी भविष्यातही अशाच विषयांवर आवश्यक ती कायदेशीर भूमिका घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
एफडीएने जारी केलेल्या नव्या नियमावलीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या नियमांची प्रत्यक्षात किती प्रभावी अंमलबजावणी होते आणि संबंधित प्लॅटफॉर्म तसेच रेस्टॉरंट्स त्यांचे कितपत पालन करतात, याकडे ग्राहकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

