(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जनावरांची अमानुष आणि नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात देवरुख पोलिसांनी धडक मोहीम राबवत तीन वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत तीन महिंद्रा बोलेरो पिकअप जप्त करण्यात आल्या असून, पाच जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
देवरुख पोलीस आणि साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत १३ आणि १४ जुलै रोजी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. साखरपा तळवाडी आणि सह्याद्रीनगर तिठा परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी करत असताना महिंद्रा बोलेरो पिकअपमधून बैल व म्हशींची वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासणीदरम्यान जनावरांना मानेला आखूड दोऱ्यांनी बांधून, हालचाल करण्यासही जागा न ठेवता दाटीवाटीने कोंबण्यात आल्याचे उघड झाले. वाहनांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. जनावरांच्या खाण्यापिण्याची सोयही करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्राण्यांशी अत्यंत क्रूरतेने वागण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय जनावरांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेले पार्टीशन नसणे, प्रथमोपचार पेटीचा अभाव, आवश्यक वाहतूक प्रमाणपत्र नसणे, वाहनावर जनावरे वाहतूक करणारे फलक न लावणे अशा अनेक गंभीर नियमभंगांची नोंद करण्यात आली. एका वाहनामध्ये जखमी अवस्थेतील म्हशीची वाहतूक सुरू असल्याचेही आढळून आले. काही चालकांकडे वैध वाहनचालक परवानाही नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे संजय करांडे, मनस्वी पावसकर, गणेश सुतार आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली. नितीन गंगाराम चव्हाण, रोहन अंकुश साळुंखे, गणेश गणपत लांबोरे, संतोष राजाराम गजचार आणि संतोष सखाराम जांगली यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत. जनावरांच्या अवैध आणि अमानुष वाहतुकीविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

