(रत्नागिरी/ प्रतिनिधी )
वय अवघे एक वर्ष चार महिने… पण कामगिरी थेट जागतिक विक्रमांच्या दालनात! रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग ग्रुपचा चिमुकला जलतरणपटू आयरिश चक्रवर्ती याने पाठीवर तरंगत १०० मीटर अंतर पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या क्रीडाविश्वात या चिमुकल्याच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात ही विक्रमी मोहीम पार पडली. २५ मीटर लांबीच्या तलावात चार फेऱ्या पूर्ण करत आयरिशने १०० मीटरचे अंतर १६ मिनिटे ४५ सेकंदांत पार केले. अवघ्या १६ महिन्यांच्या वयात त्याने साध्य केलेला हा टप्पा विशेष लक्षवेधी ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे जलतरण क्षेत्रात लहान वयातील कौशल्यविकासाची चर्चा पुन्हा अधोरेखित झाली आहे. आयरिशने महेश मिलके स्विमिंग ग्रुपमध्ये अवघ्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ही कामगिरी केल्याचे सांगण्यात आले. मुख्य प्रशिक्षक महेश मिलके, प्रशिक्षिका गौरी मिलके, प्रशिक्षक करण मिलके आणि प्रशिक्षिका तनया मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू होता. सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य तंत्रावर भर देत आयरिशला या टप्प्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे ग्रुपकडून सांगण्यात आले.
आयरिशचे पालक दुबईहून भारतात परतल्यानंतर त्यांनी पुण्यात त्याच्या जलतरण प्रशिक्षणाला सुरुवात केली. मात्र, त्याच्या अत्यल्प वयामुळे प्रशिक्षणात मर्यादा येत असल्याने त्यांनी महेश मिलके स्विमिंग ग्रुपशी संपर्क साधला आणि रत्नागिरी गाठली. येथे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयरिशचा सराव सुरू झाला. काही महिन्यांतच त्याने १०० मीटर अंतर पूर्ण करण्याचा टप्पा गाठला.
जागतिक नोंदींकडे लक्ष
आयरिशच्या कामगिरीची तीन विक्रमपुस्तकांत नोंद झाल्याचे सांगण्यात आले असून, ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ आणि ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दोन्ही संस्थांकडून अधिकृत नोंद झाल्याची पुष्टी अद्याप झालेली नसल्याने त्याबाबतची पुढील घोषणा महत्त्वाची ठरणार आहे. चिमुकल्या आयरिशच्या या कामगिरीमुळे त्याचे पालक आणि महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या प्रशिक्षकांचे कौतुक होत आहे. रत्नागिरीत जलतरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीतील खेळाडू घडविण्याच्या प्रयत्नांना या यशामुळे नवी ओळख मिळाली आहे.


