(रत्नागिरी)
पानवल (ता. रत्नागिरी) येथे सार्वजनिक रस्त्यावर जांभा दगडाचे चिरे ठेवून वाहन आणि नागरिकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तनिष्का भाग्यवान होरंबे (वय २६, रा. पानवळ, होरंबे वाडी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.४५ ते १०.१५ या वेळेत गिरीश विलास मुळे (रा. पानवल) याने चांदसर्या ते पानवल घवाळी वाडी मार्गावरील गौतम नगर कमानी ते गौतम नगर वस्ती या रस्त्यावर चंद्रकांत रघुनाथ मुळे यांचे बागेजवळ जांभा दगडाचे चिरे रस्त्यावर ठेवले. त्यामुळे ग्रामपंचायत रजिस्टर नमुना क्र. २३ अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे गौतम नगर वस्तीमध्ये जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. १३४/२०२५ नुसार, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६(२) अंतर्गत गिरीश मुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.