कळझोंडी धरण कामगारांच्या लढ्याला यश; प्रथमेश गावणकर यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार
अमित कांबळे / विल्ये
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांचा कामगारांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठविणारे प्रथमेश गावणकर यांनी कळझोंडी धरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी शासकीय अधिकारी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. तसेच या मागण्यांसाठी वर्षभराच्या कालावधीत त्यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनही करण्यात आले होते.
या आंदोलनाला यश मिळून कंत्राटी कामगारांच्या मानधनात वाढ करण्यात आली. या निर्णयामुळे आनंद व्यक्त करत कामगारांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रथमेश गावणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पेढे वाटून जल्लोष केला.
जयगड पंचक्रोशी, खंडाळा परिसर तसेच रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठीही प्रथमेश गावणकर यांनी अनेक आंदोलने आणि पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामीण भागातील नागरिक आणि युवकांनी त्यांच्या सामाजिक चळवळीला पाठिंबा दिला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले युवा नेतृत्व म्हणून प्रथमेश गावणकर यांची खंडाळा पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असून, त्यांच्या लोकहिताच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
https://ratnagiri24news.com
Leave a Comment
Leave a Comment

