(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे बुधवारी (१५ जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील शांतीनगर परिसरात, सरकारी रेस्ट हाऊसच्या पाठीमागे सुमारे ३०० फूट अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर घडली. अपघातग्रस्त क्रेटा कारचा क्रमांक MH 01 CP 8021 असून, तिने रस्त्यावर उभ्या असलेल्या MH 05 EL 3877 क्रमांकाच्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की क्रेटा कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारचा पुढील भाग पूर्णपणे डंपरच्या मागील भागात घुसल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघाताचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक असून, घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरून गेले.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लांजा पोलिस ठाण्याचे हवालदार नासिर नावलेकर, पोलिस हवालदार विलास जाधव, हवालदार सचिन भुजबळराव, पोलिस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, कॉन्स्टेबल नितेश राणे, हवालदार डोर्लेकर, कॉन्स्टेबल मांजरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. भीषण अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कदम , पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक रेवने हे देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून, वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, अपघातातील मृत आणि जखमींची अधिकृत ओळख पटविण्याचे काम सुरू असून, उभ्या डंपरची स्थिती, सुरक्षेची उपाययोजना आणि अपघाताची नेमकी कारणे याचा तपास पोलीस करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



