(संगमेश्वर / एजाज पटेल)
विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांचा संगमेश्वर येथे व्यापारी संघ, पंचक्रोशी वैश्य समाज आणि संगम ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सत्कार करण्यात आला. संगमेश्वर बाजारपेठेतील संतोष खातू यांच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार प्रमोद जठार यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष उदय संसारे, जनार्धन शिरगावकर, संजय रेडीज, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोदशेठ भिंगार्डे, उपाध्यक्ष सुशांत कोळवणकर, प्रशांत बेडके, विवेकशेठ शेरे, दिलीपशेठ रहाटे, गुरुप्रसाद भिंगार्डे, डॉ. अमित ताठरे यांच्यासह अनेक व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
अनिलशेठ भिडे यांनी मांडले संगमेश्वरचे प्रश्न
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगमेश्वर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष अनिलशेठ भिडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना संगमेश्वर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आमदार प्रमोद जठार यांच्या निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, “प्रमोद जठार यांच्यासारखा अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा लोकप्रतिनिधी विधान परिषदेत जाणे ही कोकणासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातून संगमेश्वरचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.”
स्वतंत्र गॅस एजन्सीची जोरदार मागणी
अनिलशेठ भिडे यांनी देवरुख येथील एचपी गॅस एजन्सीमुळे संगमेश्वर परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गॅस सिलेंडरचा वेळेवर पुरवठा होत नसल्याने नागरिकांना ३५ ते ४० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असून, वेळ आणि पैशांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संगमेश्वर येथे स्वतंत्र गॅस एजन्सी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बेळगाव एसटी बस पुन्हा संगमेश्वरपर्यंत सुरू करण्याची मागणी
यासोबतच संगमेश्वरहून बेळगावकडे जाणारी एसटी बस परतीच्या प्रवासात थेट संगमेश्वरपर्यंत येत नसून देवरुख येथेच थांबवली जाते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगत ही बससेवा पूर्ववत संगमेश्वरपर्यंत सुरू करावी, अशी मागणीही व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली.
आमदार प्रमोद जठार यांचे सकारात्मक आश्वासन
संगमेश्वरमधील गॅस एजन्सी आणि एसटी बससेवेच्या प्रश्नांवर आमदार प्रमोद जठार यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, “संगमेश्वरच्या नागरिकांना होणारी गैरसोय मी सहन करणार नाही. स्वतंत्र गॅस एजन्सीसाठी संबंधित कंपनी, जिल्हा प्रशासन आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच बेळगाव एसटी बस पुन्हा थेट संगमेश्वरपर्यंत सुरू करण्यासाठी एसटी प्रशासनाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”
“माझ्या कार्यालयाचे दरवाजे जनतेसाठी कायम खुले”
सत्काराला उत्तर देताना आमदार प्रमोद जठार म्हणाले की, “हा सत्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून संगमेश्वरकरांनी दाखवलेला विश्वास आहे. व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. संगमेश्वरच्या विकासासाठी आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.”
“माझ्या कार्यालयाचे दरवाजे संगमेश्वरच्या जनतेसाठी २४ तास खुले आहेत. जनतेच्या हक्काच्या आणि विकासाच्या कोणत्याही कामासाठी मला हक्काने साद घाला,” असे सांगत त्यांनी सर्व आयोजक संस्था आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

